सर्वसामान्य माणूस

सर्वसामान्य माणूस

देह म्हणजेच मी असं हा मानतो.
हा एकच जन्म आहे असं तो समजतो.

देहाला तो जपून रहातो. आजारपणाला तो घाबरतो. त्याला मृत्यूची भीती वाटते. देहाच्या सुखांना तो खूप महत्व देतो.
त्यामुळे अन्न-वस्त्र-घरदार-पैसा-समाजातली पतप्रतिष्ठा या गोष्टीवर त्याचं सुख-दुःख अवलंबून राहतं.
आईबाप, नवरा/बायको, मुलं, नातेवाईक, मित्र, शत्रू, आवडीच्या वस्तू, आठवणी, आकांक्षा यांच्यामध्ये तो मनानं गुंततो.
त्याच्या मनासारखं झालं की त्याला बरं वाटतं. नाही झालं की त्याला दुःख वाटतं.
---------------
देवाशी त्याचे नाते -
तो देवाला सर्वसामान्य माणूस समजतो.
लहानपणी आई-बापाविषयी जशी प्रेमादराची व धाकाची भावना असते, तशीच त्याला देवाविषयी वाटते.
देवानं आपल्या मनासारखं सगळं लगेच द्यावं असं त्याला वाटतं. गोड बोलून, लालुच दाखवून, कांगावा करुन, पाया पडून, तक्रारी करुन, धमक्या देऊन आईवडिलांकडून हवं ते मिळवलं, तसंच ते देवाकडून मिळवायचा तो प्रयत्न करतो.
सुख आणि यश मी स्वकर्तृत्वाने मिळवलं आणि दुःख आणि अपयश देवानं दिलं असं तो समजतो.
दुःख दिल्यानं तो देवाचा द्वेष व तिरस्कार व रागराग करतो.
भीती-आदर-द्वेष-राग-असूया-कावेबाजपणा अशा मिश्र भावना ठेऊन तो देवाशी परस्परविरोधी वर्तन करीत असतो.
देवाच्या काल्पनिक देहाला "देव" व स्वतच्या सध्याच्या देहाला "मी" मानल्यामुळे हा घोटाळा होतो.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचं अनुसंधान त्याच्या नकळत त्याच्या देहाशी रहातं.

॥श्रीराम समर्थ॥