महाराजांची श्रीरामरायाशी असलेली अनन्यता

महाराजांची श्रीरामरायाशी असलेली अनन्यता
------------------

१) गर्भावस्थेत असल्यापासून महाराज सतत रामनाम ऐकत होते.
२) अगदी लहानपणापासून त्यांना भजनाची आवड होती.
३) सतत ते स्वतः रामनाम घेत असत. मित्रांना "श्रीराम समर्थ" हा कित्ता ते गिरवाय़ला देत असत. वेळ गप्पा-टप्पा यात घालवीत नसत.

४) अगदी लहानपणापासून ते एकांतात जाऊन रामाचे ध्यान करीत असत.
५) गाईंना रानात चरायला नेल्यावर तिथे तीन दगड एका रांगेत व पुढे एक दगड मांडून तो रामदरबार व पुढचा मारूतिराय असे समजून त्यांच्यापुढे महाराज कुमारावस्थेत भजन करीत असत.
६) ते गुरुशोधार्थ घराबाहेर पडल्यानंतर येणार्‍या जाणार्‍या साधु-बैरागी यांच्याजवळ त्यांच्याविषयी चौकशी करताना त्यांची आई त्यांची खूण "तो सतत रामनाम घेतो" अशी सांगत असे.
७) एका रामनामावर विसंबून, नेसत्या लंगोटीनिशी २ वर्षे गुरुशोधार्थ व नंतरची कितीतरी वर्ष अनेकवेळा महाराजांनी भारतयात्रा पायी केल्या आहेत.
८) एक रामनाम हृदयी धरून अनेक कसोटीच्या प्रसंगातून महाराज सहीसलामत पार पडले आहेत.

९) सद्‌गुरुंच्या आदेशानुसार भारतात अनेक ठिकाणी महाराजांनी श्रीरामरायाची मंदिरे बांधवली.
१०) मध्यम स्थितीतील लाखो प्रापंचिक लोकांना हाताशी धरून त्यांना महाराजांनी रामनामाला लावले.
११) गोंदवल्यात दोन राममंदिरे त्यांनी बांधवली.
१२) श्रीराम हे जीवनाचे अधिष्ठान ठेवून सर्व शास्त्रविहित कर्मे करण्याचा परिपाठ त्यांनी स्वतःच्या आचरणाने घालून दिला.
१३) आपल्या सर्व यशाचे श्रेय ते श्रीरामाला देत असत.
१४) श्रीरामाच्या वरकरणी जड मूर्तीवर त्यांनी इतके प्रेम करुन दाखवले की त्या मूर्तीच्या डोळ्यांतून ३ वेळा अश्रू गळले. हातातून बाण उडून पडला, अंगावरची गुलाबाची फुले महाराजांच्या हातात येऊन पडली.
१५) एकादशीला महाराज फक्त रामाचे तीर्थ घेत असत.
१६) देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय महाराज कधी जेवले नाहीत.
१७) महाराजांच्या देहाच्या कोणत्याही भागाला कान लावला तर १३ अक्षरी मंत्र ऐकू येत असे.
१८) कधी "मी" शब्दाने त्यांनी जीभ विटाळली नाही. राम काय करेल ते, रामाची कृपा असंच ते म्हणत असत.
१९) खूप नेम, अवघड योगाभ्यास, वेदान्ताचा अभ्यास यात खूप वेळ घालवण्यापेक्षा सर्वसामान्य प्रापंचिक माणसाने जागेपणी सतत रामनाम घ्यावे असे सांगून त्यांनी अवघड वाटणारा परमार्थ सोपा केला.
२०) "जो रामनाम घेतो त्यापाशी मी घोटाळत असतो" अशी खूण त्यांनी दिली.
२१) "जो रामनाम घेतो त्याच्या अडचणींमध्ये मी मदत करतो" याची प्रचीती त्यांनी देहात असताना व नंतर लाखोजणांना दिली आणि अजूनही ते देत आहेत.
३०) "रामनामाला मी जिव्हा विकली आहे", असे ते म्हणत असत.
३१) जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ति ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ॥

हे वाचून मला काय वाटले?

महाराजांचे रामप्रेम आठवून मी स्वतःला रामनामाची सवय लावण्याचा प्रयत्न करते.
रामनाम घेत असल्याने त्यांनी मला कितीतरी अवघड, प्रसंगी जीवघेण्या प्रसंगातून वाचवले आहे. मन भरकटलं, अस्वस्थ झालं की आपलं रामनाम घेणं होत नाहीये हे माझ्या लक्षात येतं.
रामनामानेच आपण महाराजांचे प्रेम व कृपा संपादन करू शकतो हे मला कळून चुकलेले आहे. हे त्यांचे प्रेम व कृपाच आपल्याला तारणार आहे आणि परमार्थाच्या वाटेवर पुढे नेणार आहे हे पक्कं ध्यानात ठसलं आहे.

॥श्रीराम समर्थ॥