महाराजांकडचे अन्नदान

महाराजांकडचे अन्नदान
---------------------
१८४५
महाराजांचे नामकरण - त्यांच्या आजोबांनी खूप अन्नदान केले.
१८५०
आजोबांनी नातवाची परीक्षा घेण्यासाठी विचारले - "तुला राजा केले तर तू काय करशील?"

पाच वर्षांचा हा छोटा मुलगा तात्काळ म्हणतो - "मी अन्नछत्र घालेन - सर्व गोरगरीब-अपंग सर्वांना जेवायला घालेन. कोणाला उपाशी ठेवणार नाही." (असं फक्त रामराज्यातच होतं म्हणतात).
१८५५-५६
महाराजांचा विवाह - आजोबांनी ८ दिवस ४००-५०० माणसे जेऊ घातली होती.
१८६०-६१
महाराज आत्मानुभवानंतर तीर्थाटन करताना कलकत्त्याला हरिहाट केला होता.- त्यामध्ये ८ दिवस रोज अन्नछत्र घातलं होतं.
१८६६
महाराजांच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात करताना गोंदावल्याला होमहवन झालं तेव्हा खूप अन्नदान झालं होतं.
१८७६-७७
भयानक दुष्काळ - रोज दीड हजार माणूस जेऊन जाई. राजा सुध्दा करणार नाही असं अन्नदान त्यावेळी झालं.
१८९१
थोरले राममंदिर प्रतिष्ठापना - आधी भजनसप्ताह, नंतर उत्सव
- विद्‌वान, पंडित, वैदिक ब्राह्मण (काशी, गया, प्रयाग, अयोध्या, पुणे, वाई, सातारा, कर्‍हाड, हुबळी, धारवाड इ. ठिकाणाहून आलेले) - भोजन, १ रेशमी वस्त्र, १ होन (सुवर्णमुद्रा)
- ऋणानुबंधींना - भोजन, १ उपरणे दिले
- कामगारांना - भोजन, १ धोतर, १ मुंडासे, ५ रू (दीडशे वर्षापूर्वीचे) दिले.
- सुवासिनींना - भोजन, त्यांची खणानारळाने ओटी भरली गेली.
- शेवटच्या दिवशी १०,००० माणूस जेवलं.

१८९२ ते ९८ दरम्यान
धाकटे राममंदिर प्रतिष्ठापना
१ गायत्री पुरश्चरण, रुद्रस्वाहाकार
८ दिवस अन्नछत्र झालं.

१८९८-९९
आई व १०० जण बरोबर घेऊन केलेली तीर्थयात्रा
काशी -
५ सहस्रभोजने झाली.
३ इच्छाभोजने केली.
काशी गावातील सर्व भिकार्‍यांना ५ भोजने दिली.
३ संन्यासीभोजने घातली.
आईच्या हाताने वस्त्र व पैसा यांचे अगणित दान दिला.
अयोध्या
सबंध अयोध्येतील भिकारी, गरीब, बैरागी, वैदिक यांना गावजेवण, अगणित रुपयांचे दान केलं.
आई गेल्यावर - १० व्या दिवसापासून १३ व्या पर्यंत
- असंख्य गरिबांना अन्नदान केलं.
- १०० गाई दान दिल्या.
- १०० वैदिकांना वस्त्रे व पात्रे दिली.
- १०० सुवासिनींना लुगडे दिले.
- प्रत्येक भिकार्‍याला १ घोंगडी दिली.
इंदूर
आईच्या वतीने गावजेवण घातलं, दक्षिणा दिल्या.
१८९६
दुष्काळ
शेतात काम करेल त्याला रोज १ वेळचे जेवण दिलं.
म्हातार्‍याकोतार्‍यांसाठी रोज धान्य वाटप केलं गेलं.
१०००० जप करणार्‍याला एक वेळचे जेवण दिलं.
विप्र (अनुष्ठान करणारे) - १ वस्त्र, रोज १ वेळचे जेवण दिलं
१८९७
श्रीरामरायाच्या डोळ्यांतून अश्रुपात
अन्नदान केलं.
१९०५
तीर्थयात्रा
प्रयाग (नाव उलटण्याचा प्रसंग)
- नावाड्यांना वस्त्र, नारळ, रुपये दिले.
- अन्नदान केलं.
- प्रयागातील भिकार्‍यांना खीरपुरीचे जेवण दिलं.
काशी
- विश्वेश्वराला नैवेद्य (जिलेबी) दु. १२ ते रात्री ८ पर्यंत पंगती चालल्या.
- १०० शास्त्री-पंडितांना भोजन, १ वस्त्र दिलं.

गोंदावले
कित्येक गरीब घरातील मुलांच्या मुंजी लावल्या, लग्ने लावली, बारशी केली.

१९०७ ते १९१३ (वय ६२ ते ६८)
- रोज अन्नदान (किमान ५०० पाचशे माणूस) केलं गेलं.
- दर आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी गावजेवणं घातली.
- वर्षातून सतत उत्सव त्यानिमित्त अन्नदान केलं.
मिरज
- गावजेवण घातलं.
- सर्व सुवासिनींना भोजन, प्रत्येकी १ लुगडे दिले.
- सर्व भिकार्‍यांना खीरीचे भोजन व १ रु दक्षिणा दिली.
१९१३
रामनवमीचा उत्सव
१० दिवस अन्नदान झालं.
पारण्याला १०००० पान झालं.

हे सगळं खूप वेळा वाचून मला काय वाटलं? माझ्यात काय फरक पडला?

- मीही अन्नदान करायला लागले. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता, सत्पात्री दानाची सवय लावून घेतली. जे मी आनंदानं खाईन असं ताजं सकस सुरस व षडरसयुक्त भोजन करण्याची व वाढण्याची सवय मला सहज लागली.
- रस्त्यातून जाताना हात पुढे आला की पायातली चप्पल काढून दान करायला सहज जमू लागलं. किती देतोय याचा हिशेब न करता, घेणार्याानं आपल्यावर घेऊन उपकार केले या भावनेनं दान होण्यात मोठी गंमत वाटू लागली.
- मला भगवंत पुरवेल अशीही खात्री वाटू लागली.
- माझी खाखा कमी होऊन इतरांना तृप्त करण्यात आनंद वाटू लागला.
- आपल्या हातून तीर्थक्षेत्री अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा, दीपदान, पूजासाहित्यदान, सौभाग्यवायन व्हावं यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
- रोज सकाळी स्वयंपाकघरात ओटा साफ करून श्रीरामापुढे दिवा दाखवून मगच गॅस पेटवायचा व रोजचा नैवेद्य करायचा अशी सवय मला लागली.
- महाराजांना नैवेद्य दाखवून मगच जेवायचं कोठेही असलं तरी असंही घडू लागलं.
- आलेल्या विप्रांना संतुष्ट केल्यानं किती वाटतं हे मी अनुभवते.
- या सर्व वेळी मला वेळोवेळी मी काय करावं याची आठवण महाराज करतात.

॥श्रीराम समर्थ॥