१५ ऑक्टोबर
लीन माणसाला भगवंत लवकर साधेल.
-----------------------------
साधना करताना आपले साध्य भगवंत आहे की नाही हे तपासावे.
जर भगवंत हवा असे आपले ठरले तर -
- अभिमान टाकून नामस्मरण करावे.
- परमेश्वराला अनन्यशरण जाऊन त्याचे नाम घेत जावे.
- भगवंताच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करावा. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. यात क्रोध गिळण्याचे श्रम आहेत.
- वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात सावधगिरी बाळगावी. नको ते टाळावे.
- लीनता अंगी कशी येईल ते पाहावे. मनाने बळकट मात्र वृत्तिने लहान व्हावे.
- स्वतःशी २४ तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये असे आपले वागणे असावे.
- भगवंताची आस वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासात व्हावे.
- रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते आपण दिवसभर करावे. त्याकरीता आपली वृत्ति नामामध्ये गुंतवून ठेवावी.
- सर्वांमध्ये असावे आणि तरीही कोणाचेच नसावे अशी वृत्ती ठेवावी.
- पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा यांच्या तावडीत सापडू नये.
- ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे.
म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष बाधणार नाहीत.
॥श्रीराम समर्थ॥