२४ ऑक्टोबर

२४ ऑक्टोबर
परमेश्वराची खरी पूजा
-----------------------------
वैराग्य -
वैराग्य म्हणजे विषयाची अनासक्ती.
भक्ती -
भक्ती म्हणजे परमेश्वराची आवड
भक्ती आणि वैराग्य यांच्या मध्ये तसा फरक नाही.
----------------------------
सगुणोपासना -
चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे. ते कोठेही प्रकट होऊ शकते.
त्याला प्रकट करणे साधकाच्या भावनेवर अवलंबून असते.
ज्याची भावना खरी शुध्द म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. साधकाची भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे.
"माझ्या देवाला हे आवडेल का?" अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे.
सगुणाच्या उपासनेला आजच प्रारंभ करावा.
मागून आपोआप निश्चयात्मकता येईल.
ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते.
सर्वांभूती भगवद्‌भाव आणि कोणाचे मन न दुखवणे ही खरी पूजा आहे.
पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरुर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.
-----------------
साधकाने साधन करताना कोणती काळजी घ्यावी?

"मी साधन करतो" हा साधनाभिमान आहे जो देहाभिमानामुळे येतो.
हा अभिमान घातक असतो.
हा देहाभिमान नाहीसा होण्यासाठी जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानावे. आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते. परमेश्वर साधकाच्या भल्याकरीताच सर्व करीत असतो. त्यामुळे साधकाने कसलीही काळजी करु नये.
भगवंतावर विश्वास टाकून साधकाने आनंदात असावे.
आपली चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी.
तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी - त्यावर लक्ष असावे.
मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे (महाराजांचे) स्मरण करावे.
बर्‍याच वेळाने आठवण झाली तरी माझे (महाराजांचे) स्मरण करावे
असे केल्याने पुढे लवकर लवकर आठवण होऊ लागेल.

॥श्रीराम समर्थ॥