मी चार शरीरांचा जीवात्मा

मी चार शरीरांचा जीवात्मा
-----------------
लहानपणापासून वाचनाचा नाद मला होता. त्यात रामायण, महाभारात, पुराणं, त्यातील विविध प्रभावी व्यक्तींची ललित चरित्रं वाचनात होती.

सृष्टीची उत्पत्ती, तोचं भविष्य, तिचा निर्माता, तिला नियंत्रित करणारी शक्ती, त्या शक्तीचा हा सर्व उपद्‌व्याप करण्यामागचा हेतू याविषयी चिंतन माझ्या मनात चालत असे.

शाळा, अभ्यास, परीक्षा हे विश्व सांभाळत असतानाच, दैनंदिन जगणं चालू असताना मन ज्या असंख्य घटनांना तोंड देत होतं त्यातून मी कोण आहे? नेमकी कशी आहे? मला नेमकं काय हवं आहे? आसपास घडणार्‍या घटनांचा अर्थ मी काय लावायचा? अपेक्षित आदर्श विचार-आचारसरणी आणि वास्तवातील त्या आदर्शांना छेद देणारी सर्वांची विचार-आचारसरणी यांचा अर्थ कसा लावायचा? या वावटळीत मी सापडत असे. एकाकी हतबलता काही काळ अनुभवल्यानंतर मी रोजच्या जगण्यात पुन्हा स्वत:ला लोटून देत असे.

जीवात्म्याविषयी जरी पूर्वी अनेक वेळा वाचलं होतं तरी त्याचं आकलन न झाल्यामुळे विस्मरण झालं होतं. मी जो विषय मागे सोडला होता तो २००४ पासून नव्या उत्साहानं वाचायला घेतला.

श्रीरामोपासना व श्री सद्‍गुरुंची प्रचीति आली. जन्म, मृत्यू, मृत्यूनंतरची गती याविषयी गरुडपुराणात वाचलं. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी याविषयी माझ्या सद्‌गुरुंची प्रवचने वाचली.

चार देहांविषयी मी परमपूज्य स्वामी मुक्तानंदांच्या ‘चित्‌शक्ती विलास’ या आध्यात्मिक आत्मकथेत सविस्तर वाचलं.

कर्मगती याविषयी अधिक खोलात श्रीसद्‌गुरुचरित्राच्या भाष्यामध्ये श्री कुर्लेकर यांच्या पुस्तकात वाचलं.

मागील जन्मात केलेल्या योग्य-अयोग्य (आपल्या व्याख्येप्रमाणे नव्हे, तर परमेश्वराला अपेक्षित) कर्मांच्या संयुक्तिक फ़लानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणजे काय तर कर्म करण्यासाठी एक देह मिळतो. हा देह कोणाचा ते हे एक नियंत्रण करणार्‍या शक्तीनं आधीच ठरवलेलं असतं.

म्हणजेच आपल्या आईवडिलांची नियुक्ती आधीच झालेली असते. म्हणजेच कोणती जात, कोणता परिसर हे ही आधीच ठरलेलं असतं. जन्म कसा, केव्हा होणार हे ही ठरलेल असतं. हद्द म्हणजे आपल्या श्वासांची संख्या, मृत्यूचे संवत्सर (वर्ष), तिथी (दिवस), वेळ ही ठरलेले असते. त्याच्या पुढचं म्हणजे मृत्यू कसा, कोठे येणार हे ही ठरलेलं असतं.

पहिला श्वास ते शेवटचा श्वास या कालावधीमधलं, मृत्यूलोकामधलं कर्म कसं करायचं ते आपल्या योनीनुसार ठरतं.

पशू, पक्षी, वनस्पती इ. ची भोगयोनी मानली जाते, म्हणजे उपजत आवेगांनुसार कर्म करायचे व मोकळे व्हायचे. हे कर्म आपण कशासाठी करतोय? त्याचे फ़ळ काय मिळणार? आपण आधी कोण होतो? मृत्यूनंतर कोठे जाणार? या जिज्ञासेचा अभाव असतो.

मनुष्ययोनीला कर्मयोनी म्हटलं आहे. याचा अर्थ फ़लाचा विचार करून कर्म करावे असे अपेक्षित असते. म्हणूनच आदर्श व प्रत्यक्ष वास्तविक विचारसरणींचा झगडा आपल्या मनात चालू असतो. जन्माच्या वेळी पूर्वजन्मांचे विस्मरण होण्याची एक कळहे असते.

असं म्हणतात की, गर्भवासात जीवात्मा आपल्या चुकांबद्दल खूप खेद व्यक्त करीत असतो. या जन्मात पुण्याचरण करीन, परमेश्वराच्या सत्तेचे भान ठेवीन व मोक्षासाठी प्रयत्न करीन असेही तो ठरवत असतो. मात्र जन्मानंतर त्याचे त्याला विस्मरण होते व तो नवीन जन्म व त्यानंतरच्या आव्हानांना तोंड देता देता मायेत कसा गुरफ़टला जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही.

॥श्रीराम समर्थ॥