साधनमार्गामधील चार मुक्काम

साधनमार्गामधील चार मुक्काम
संदर्भ - चरित्र पान ६४९-५०-५१
----------------------
समाधान मिळवण्याच्या साधनमार्गामध्ये चार मुक्काम लागतात.

पहिला मुक्काम
सद्‌गुरु व त्याच्याकडून आलेले नाम खरे वाटायला लागणे.

येथे साधकाच्या दैनंदिन जीवनात सद्‌गुरुला व नामस्मरणाला स्थिर स्थान प्राप्त होते.

दुसरा मुक्काम
नामस्मरणाचा अभ्यास दृढ होत चालला म्हणजे मी व माझे जग यांच्याहून सद्‌गुरू व नाम अधिक खरे वाटायला लागतात.
माझ्या देहाचे, पैशाअडक्याचे, नातेवाईकांचे, लौकिकाचे माझ्या मनात स्थान भ्रष्ट (महत्व कमी होते) होते.
तेथे सद्‌गुरु व नाम आरूढ होतात.
सार्‍या दृश्य प्रपंचाची किंमतच कमी होते
नामात व्यत्यय आला तर जीव अस्वस्थ होतो.
मृत्यूची जाणीव सुटत नाही
वेळ वाया घालवण्याचे जिवावर येते.
साधनाचा स्वतःचा एक घाट तयार होतो.
आचरणामध्ये त्याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते.

तिसरा मुक्काम
सद्‌गुरु आणि नाम पूर्णपणे खरे वाटतात.
मी, माझा देह, व माझे जग असून-नसल्यासारखे होतात.
नामस्मरणामध्ये नामाची धारा सुरु होते.
नामाला स्वतःची एक गती येते.
साधकाचा जीव त्या गतीबरोबर वहात जातो. त्या वाहण्यात मधूनमधून नकळत स्वतःला तो विसरतो. त्या विस्मृत स्थितीत आपण कोठे आहोत, कशा स्थि्तीत आहोत, किती काळ आहोत याचे भान उरत नाही. या बेभान स्थितीत अनुसंधान म्हणजे काय हे बरोबर अनुभवास येते. पुढे अनुसंधानाची चटक लागते. तिचा अंमल सुरु झाला की साधक विस्मृत अवस्थेत दिवस-रात्री घालवतात. कित्येक वेळा त्यांना देहभानावर आणावे लागते.

मुक्काम चौथा
अनुसंधान पचनी पडल्यावर नामाची धारा तिन्ही अवस्थांमध्ये (जागृत+स्वप्न+सुषुप्ति) अखंड चालते. दुसरीकडे व्यवहारापुरते देहाचे व जगाचे भान राहते. परंतु जिकडे तिकडे सत्तारुपाने सद्‌गुरुचे दर्शन घडते. देहावर संपूर्णपणे सद्‌गुरुची मालकी प्रस्थापित होते. त्यांच्या इच्छेचे साम्राज्य सर्वत्र पसरते. देह यंत्रवत्‌ चालवला जातो. कर्तेपणा शिल्लक उरत नाही. साधक जीवनाचा सर्वांगाने स्वीकार करतो.

॥श्रीराम समर्थ॥